समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव ता. २७ : चास नारोडी (ता. आंबेगाव) येथे सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्री आणि शुक्रवारी (ता. २६) दिवसभर असे मिळून तब्बल २४ तासांच्या जवळपास वीज गेल्याने चास आणि परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे चास आणि परिसरातील नागरिक घामाघूम झाले आहेत.
उन्हाळा असल्यामुळे राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; मात्र चास आणि नारोडी परिसरात महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत.
विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके करपू लागली आहेत. वेजेवर चालू असणारी अनेक उपकरणे, कडबा कुट्टी, पिठाची चक्की, गावच्या नळपाणी पुरवठा योजनेचे पंप आदी गोष्टी ठप्प झाल्याने या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, हे भारनियमन फक्त आमच्याच गवापुरते आहे का, असा संतप्त सवाल विचारत आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, संबंधित अधिकारी देखील वर बोट करून जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.