समर्थ भारत वृत्तसेवा:
शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडीचा गोंधळ कायम असून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे आता नक्की झालंय. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तुल्यबळ ठरू शकणारे उमेदवार मा. खा. शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय आता कुठलाही पर्याय नाही.
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मा. खा. आढळराव पाटील लढू शकतात असे बोलले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. खा. आढळराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा असल्याचे बोलले जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांचा आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेण्यास विरोध असल्याचेही चित्र आहे.
या मतदार संघात महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हेंनाच उमेदवारी मिळणार यावर आता शिक्कमोर्तब झाले असून त्यांच्याविरोधात मा. खासदार शिवाजी आढळराव पाटील उमेदवार असतील तरच ही लढत तुल्यबळ होईल असे राजकीय जाणकार सांगतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आढळराव पाटील यांच्यातील अजाची वाटाघाटी यशस्वी झाली तर येत्या काही दिवसांत आढळराव पाटील राष्ट्रवादी सोबत जाऊ शक्यता. मात्र त्यांच्या या भूमिकेला अनेक शिवसैनिकांचा विरोध असून, शिंदे सेनेतील अनेक शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरपवापासी करतील अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे आणि मा. खा. आढळराव पाटील यांच्यात शिरूरच्या जागेच्या संदर्भात खलबते सुरू असून, या चर्चेमध्ये आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सभापती (बांधकाम) मंगलदास बांदल हे देखील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात असून, ते या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.