समर्थ भारत वृत्तसेवा:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि मानसपुत्र अशी ओळख असलेले आंबेगाव विधानसभेचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील अनपेक्षितपणे अजित पवारांसोबत जाऊन शरद पवारांना मोठा धक्का दिला. मंत्री वळसे पाटलांच्या मतदार संघात शरद पवारांची उद्या (दि. २१) जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्समुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात फक्त अजित पवारांची दादागिरी! चालत असून; राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित पवार हेच दादा आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर अजित पवारांची ही जागा आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी आंबेगाव तालुक्यातील मंचर-कळंब परिसरात करण्यात आली आहे. या बॅनरवर 'वादा तोच..! पण दादा नवा' असा मजकूर लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सहकार मंत्र्याच्या गोटात कमालीची खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची उद्या मंचर येथे जाहीर सभा होतीये. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या बॅनर्सवर 'मी येतोय...' असा संदेश लिहून वातावरण आधीच तापवले आहे तर दुसरीकडे 'वादा तोच..! पण दादा नवा..!',अशा आशयाचे बॅनर्स झळकल्यामुळे पुण्याच्या राजकारणात या बॅनर्सची मोठी चर्चा सुरु आहे. शरद पवार आणि आ. रोहित पवारांच्या बॅनर्समुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ नेत्यांना फारसे फिरकू दिले नाही, त्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांचा म्हणावा असा प्रभाव कधीही नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी पासूनच पक्षातील अनेक नेते दोन गटात विभागले गेले होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांसोबत असल्याने आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ हा आधीपासूनच शरद पवारांच्या विचारांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. त्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात वादा तोच..! पण... दादा नवा...!', अशा आशयाचे बॅनर्स झळकल्याने आता वळसे पाटलांचे टेन्शन अधिकच वाढले असल्याचे बोलले जात आहे.