समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर ता. ५ : सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत घरोबा केला होता. ही बाब शरद पवारांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजप सोबत गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची पोलखोल करण्याचे जाहीर केले होते. या पोलखोल मोहिमेची सुरुवात विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यातील अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींमुळे या मोहिमेला ब्रेक लागला होता.
या पोल खोल मोहिमेमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा येवला मतदार संघ आणि धनंजय मुंडे यांच्या बीड मधील सभा वगळता अन्य ठिकाणी सभा झाल्या नव्हत्या. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा या मोहिमेला मंचर मधून सुरुवात करण्याचे ठरवले असून. मंचर मध्ये होणाऱ्या सभेत ते सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे देखील उपस्थित असणार आहेत. सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात देवदत्त निकम यांची शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांशी जवळीक वाढण्याचे पाहायला मिळत असून, आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी देवदत्त निकम हेच उमेदवार असल्याचे मानले जात आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि भाजप सोबत चांगलेच जुळवून घेतले असून; एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवाजीराव आढळराव पाटील आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रत्येक वेळी एकमेकांना पूरक राजकारण करून मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना संगनमताने संपविण्याचे काम केले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शरद पवारांनी खासदार कोल्हे यांना पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वळसेंना लक्ष्य करताना ते खासदार कोल्हेंच्या निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळही त्यांच्या मतदारसंघातील या सभेत फोडतील, असा अंदाज आहे. खासदार कोल्हेंनी शरद पवारांना साथ दिल्याने ते पु्न्हा शिरुरमधून कसे निवडून येतात, ते पाहतोच असे खुले आव्हान नुकतेच अजित पवारांनी दिले आहे. दुसरीकडे शिरुरमध्ये शरद पवारांचेही दौरे वाढले असून गेल्या महिन्याभरात ते दोनदा जु्न्नरला येऊन गेले. आता तिसऱ्यांदा ते येत आहेत. त्यातून त्यांनी अजित पवारांनी खासदार कोल्हेंना दिलेले चॅलेंज स्वीकारल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांनी देखील शिरुर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असल्याचे चित्र आहे.