समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर ता. ६ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लांडेवाडी येथील शिवाजी दादू लवांडे यांची मुलगी अश्विनी बाळू केसकर यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप लवांडे कुटुंबीयांनी केला होता. याबाबत त्यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र मंचर पोलिसांकडून याबात हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपास केला जात नसून यातील दोषींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून केला गेला असून पोलिसांनी निष्पक्षपणे जबाबदाऱ्या पार न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शिवाजी लवांडे यांची मुलगी अश्विनी लवांडे केसकरला प्रसूतीसाठी लांडेवाडी येथील शासकीय आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. मात्र या आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टर उपस्थित नसताना येथील परिचारिकेने सदर प्रसूती केली. त्या नंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. यावेळी सदर आरोग्य केंद्रात कुठलेही डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हते. रुग्णाची अवस्था पाहून रुग्णाच्या आईने आरडाओरडा केल्याने एका कर्मचाऱ्याने परिचारिकेला फोन करून बोलावून घेतले. त्या नंतर अश्विनी केसकर यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
अश्विनी बाळू लवांडे यांच्या प्रसूती दरम्यान अनुपस्थित असणारे डॉक्टर, बेजाबदारपणे प्रसूती करणाऱ्या परिचारिका, आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी हेच अश्विनी लवांडे केसकर यांच्या मृत्यूला कारणीभूत असून, सदर प्रकरणातील दोषींना पोलिस आणि आरोग्य प्रशासन पाठीशी घालत असून, जर पोलिसांनी आणि आरोग्य प्रशासनाने निष्पक्ष आणि जबाबदारीने काम केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंचर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन मंचर पोलिसांना देण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष पंकज सरोदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा दिपाली सरोदे, उपाध्यक्षा संगीता मिरके, सल्लागार साधू लवांडे, सचिव सुरेश रोकडे, रतन साबळे, संदीप मिरके, प्रदीप साळवे आदि पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असून संबंधित कुटुंबियांचा गैरसमज झाला असल्याचे म्हटले आहे.
न्याय मागणाऱ्या भावाला पोलिसांकडून धमक्या?
दरम्यान माझ्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या बेजाबदार डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून, संबंधितांना कठोर शासन करून माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या अशी याचना करणाऱ्या आशुतोष लवांडे यांना न्याय देण्याऐवजी पोलिसांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप मयत अश्विनी लवांडे केसकर यांचे बंधू आशुतोष लवांडे यांनी केला आहे.
बेजाबदार कर्मचारी आणि असंवेदनशील पोलीस
लांडेवाडी येथील संबंधित आरोग्य केंद्राच्या बेजाबदार कर्मचाऱ्यांमुळे अश्विनी लवांडे केसकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. दरम्यान मयत मुलीचे कपडे जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रतन असो अथवा मुलीच्या आईला प्रसूती कक्षाची सफाई करायला लावण्याचे दुष्टकर्म असो, येथील कर्मचाऱ्यांनी लवांडे परिवाराला अतिशय हीन आणि गलिच्छ वागणूक दिली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अशा परिस्थितीतही पोलीस आणि आरोग्य प्रशासन लवांडे कुटुंबियांना न्याय देण्याऐवजी त्यांना अजून हीन आणि गलिच्छ वागणूक आणि धमक्या देत असून, या सर्वांना पोलीस पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप लवांडे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.