समर्थ भारत वृत्तसेवा:
पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक
घटना घडली आहे. आपल्या पोटच्या लेकरांना विष पाजून
एका बापाने त्यांची हत्या केल्याची घटना
समोर आली आहे. सुदैवाने यात मुलगी वाचली आहे. मात्र
यात मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर
पत्नीला गळफास देत, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं
पारनेर तालुक्यात व परिसरात खळबळ उडाली आहे. या
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडेने आपल्या
मुलांना विषारी औषध पाजून व पत्नीला गळफास देऊन स्वतः
ही आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी
(दि.५) दुपारी उघडकीस आली आहे.
या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलगा आणि पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे मृत झाले असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन रोकडे, पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. याबाबत मयत गजानन रोकडे याचा भाऊ विजय भगवान रोकडे (रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) याने रात्री उशिरा पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत गजानन याने त्याची पत्नी पौर्णिमा हिच्याशी मोटारसायकलवर जात असताना झालेल्या भांडणाच्या रागातून मुलगी चैताली आणि मुलगा दुर्वेश यांना विषारी औषध पाजले. मात्र चैतालीला उलटी झाली नंतर तेथून तिने शीताफिने पळ काढला. मुलगा दुर्वेश याला नंतर पाण्याच्या डबक्यात फेकून दिले.
पत्नी पौर्णिमालाही विषारी औषध पाजले. नंतर
तिचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः ही गळफास
घेऊन आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या दुर्दैवी
घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून नऊ
वर्षांची मुलगी चैताली रोकडे ही बचावली आहे. या घटनेने वारणवाडीसह
पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या
का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पारनेर पोलीस घटनेचा
तपास करत आहेत.