समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव ता. १६ : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील मारुती मंदिरा शेजारी असलेल्या इमारत अतिक्रमण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबत घोडेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. १३ डिसेंबर २०२३ रोजी घोडेगाव ग्रामपंचायत मारुती मंदिराशेजारील मिळकत क्र १७३ आणि १७५ अ या जागेत अतिक्रमण झालेल्या इमारतीवर हातोडा पडणार असल्याची चर्चा होती. असे पत्रही समोर आले होते.
यानंतर मिळकत क्र. १७३ व १७५ अ या जागेवर झालेल्या आतिक्रमणावरकारवाई करण्यासंदर्भात घोडेगाव ग्रामपंचायतीचा काय निर्णय झाला याची माहिती अद्याप पर्यंत समोर आली नसून घोडेगाव व पंचक्रोशीत या इमारती संदर्भात अनेक उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. या अतिक्रमण झालेल्या इमारतीवर ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात जाणार असल्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे, ज्येष्ठ पत्रकार विलास काळे यांनी म्हटले आहे.
घोडेगाव ग्रामपंचायत मिळकत नंबर १७३ व १७५ अ या जागेत अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई न केल्यास घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीत चौकात ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्याठिकाणी मोठ्या स्वरूपात टपऱ्या टाकून आंदोलन करणार. (विलास काळे)
कारभारी आउट ऑफ रीच!
घोडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच अश्र्वीनी तिटकारे आणि ग्रामविकास आधिकारी अलका रहाणे यांना मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा संपर्क जोडला गेला नाही. या बाबत व्हॉट्सपवर अतिक्रमणासंदर्भात आपले मत मांडण्यासाठी विचारले असता त्यावरही सरपंच आणि ग्रामविकास आधिकारी अलका रहाणे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे आणि पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विलास काळे यांनी म्हटले आहे.
कोणाच्या आदेशाने कारवाई थांबली?
यापूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांना सांगितले गेले असताना, संबंधित अतिक्रमणे काढण्यासाठी नक्की कोणाचे आदेश मिळाले? सदर अतिक्रणावर कारवाई करायला गावचे कारभारी आणि त्यांचे नेते, कोणाला घाबरतात, की यामध्ये काही राजकीय सोय आहे?? अशा उलट सुलट चर्चांना घोडेगावमध्ये उधान आले आहे.