समर्थ भारत वृत्तसेवा: मंचर
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवा करिता निघालेल्या श्री तपणेश्वर पायी दिंडीचे मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वागत केले.
श्री तपनेश्वर पायी दिंडीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून; मंचर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी वारक-यांचे स्वागत करून पालखीला हार घालुन दर्शन घेतले. या दिंडीत तब्बल २५० वारकरी होते. या वेळी दिंडी प्रमुख शशिकांत कडधेकर तसेच विणेकरी यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मंचर पोलीस ठाण्यासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ही दिंडी मंचर पोलीस ठाण्यात तब्बल एक तास थांबली, यावेळी दरम्यान सर्व वारकऱ्यांना मंचर पोलीस ठाण्यात अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कार्तिकी एकादशी पायी दिंडीची परंपरा जोपासणारे वारकऱ्यांसोबत पोलीस बांधवांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेवुन तर पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे व पोलीस अंमलदार यांनी गळ्यात टाळ घेवुन टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलीचा जय घोष करत दिंडीत सहभाग घेतला.