समर्थ भारत वृत्तसेवा:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणार, असे 'चॅलेंज' दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अशाच प्रकारचे 'चॅलेंज' 2019 च्या पुरंदर विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना दिले होते. आणि त्यानंतर शिवतारे यांचा पराभव झाला. तर, काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते. त्यामुळे अजित पवार यांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
सध्या राज्यात शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. पवार यांच्या वाट्याला बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघ येण्याची चिन्हे आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.
बारामती स्वतः अजित पवार निवडून आले आहेत. इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे, पुरंदर मतदारसंघात संजय जगताप, भोर - वेल्हा- मुळशी मतदारसंघात संग्राम थोपटे, खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना विजयी होण्यास कठीण परिस्थिती आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील प्रमुख इच्छुक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विरोधी पक्षांकडे उमेदवार नसल्याचे म्हटले आहे.