समर्थ भारत वृत्तसेवा:
सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे, तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.
जुन्नर तालुक्यातील घोणसच्या सर्पदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी (दि. 6) केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव आणि केंद्रीय वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल याची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कर्नाटक, ओरिसा, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ राज्यात सर्पदंशामुळे मृत्यू वा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते याकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातही याच धर्तीवर आर्थिक मदत देण्याचे व उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीतील गांभीर्य ओळखून केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी तातडीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. जी. टेंभुर्णीकर यांना पत्र पाठवून सर्पदंशापासून स्थानिक ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याच्या आणि सर्पदंश झालेल्या स्थानिक ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे.
राज्यातील आमदारांनी आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारला त्वरीत कार्यवाही करण्यास भाग पाडावे, व राज्य सरकारनेही सर्पदंशामुळे मृत्यू वा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत तसेच वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलून जुन्नर तालुक्यात स्नेक बाईट केंद्र सुरु करण्याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.