समर्थ भारत वृत्तसेवा:
राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी बळीराजांचा अवमान करून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन चाकणकरांविरूद्ध कारवाई करून पदमुक्त करण्याच्या मागणीचा भाग म्हणून पुण्यातही निदर्शने करण्यात आली.
रूपाली चाकणकरांनी १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुकवरून बहूजनांचा राजा बळीराजांच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केला होता. मुळात राज्यातला शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मीता मानतो. दिवाळी बलीप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपुजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगीरी या ग्रंथात सिद्ध केला.
या पोस्टबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न विचारणारांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे. संवैधानिक पदावर बसल्या असतांना चाकणकर यांनी महापुरूष बळीराजांचा वारसा नाकारत वामनाचे उदात्तीकरण केले. त्याचप्रमाणे प्रशासनाला खोटी माहिती देत सामाजिक संघटनेची व पदाधिकाऱ्याची नाहक बदनामी केली आहे. अशा असंवैधानिक पदाचा दुरूयोग करणाऱ्या चाकणकरांना पदमुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केली आहे.
यावेळी 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो' अशा घोषणा देण्यात आल्या. तदनंतर रितसर निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रदिप कणसे सहसंघटक अशोक काकडे, विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम,जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर,उपाध्यक्ष वैभव शिंदे, प्रशांत नरवडे,नागराज लावंड,गणेश कुंजीर,कैलास कणसे,राणाप्रेमजितसिंह पवार,प्रशांत तापकीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.