समर्थ भारत वृत्तसेवा
पेठ ता. २७ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, बटाटा, ज्वारी, हरभरा, लसूण, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे.
आज सकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांनी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करायला सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातगाव पठारावरील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात केली.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, मंडल कृषी अधिकारी, सरपंच मनीषा तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, कैलास तोत्रे, पोलीस पाटील प्रगती तोत्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, संतोष धुमाळ, माऊली एरंडे, तलाठी माने, दत्तात्रय तोत्रे आदी उपस्थित होते.
दरम्यान शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिली. कालच्या पावसाने सातगाव पठारातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून दोन दिवसात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पूर्व आंबेगावातील वडगाव पीर, लोणी, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी तर सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.