समर्थ भारत वृत्तसेवा:
मंचर ता. २७ : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा वेळी शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम भल्या सकाळीच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला गेले आहेत.
रविवारी (दि. २६) झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आंबेगाव, शिरूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली असून, काही ठिकाणी काढणीला आलेला कांदा, ज्वारी, गहू, बीट, कोबी, फ्लॉवर, धना, मेथी, चारा आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.
आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नोंदी घेतल्या असून ते या पाहणी दौऱ्यानंतर संबंधित अधिकारी आणि शासनाकडे या संदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची मागणी असल्याचे समजते.
पूर्व आंबेगावातील वडगाव पीर, लोणी, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी तर सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.