आंबेगाव प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये लोणी,धामणी, खडकवाडी, वडगावपिर,शिरदाळे,मांदळवाडी, रानमळा ,वाळूज नगर ,या परिसरामध्ये 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांसाठी असणारा चारा, पिके, घास, गवत, मका, गहू, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे दिवस चालू असताना पावसामुळे असणारे कांदा रोप त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची बटाटे काढण्याची लगबग सुरू होती अशा शेतकऱ्यांचे बटाट्याचे नुकसान झाले आहे.
प्रचंड नुकसान झाल्यामुळे व गारांचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अगदी शेतातील उभ्या असणाऱ्या झाडांना पाला देखील राहिलेला नाही. लोणी धामणी परिसरामध्ये असणार उपबाजार समितीचे मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झालेले असून कृषी विभागाने शेतामधील झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान त्याचप्रमाणे लोणी बाजार समिती या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे नुकसान याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.