पुणे प्रतिनिधी :
कोरोना कालावधीत पुणे महापालिकेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अपहार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना चाचणी किट्स आणि औषधे खासगी रुग्णालयांत विक्री करून ८० ते ९० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सतीश बाबुराव कोळसुरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा सूर्यकांत तायडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयासाठी कोरोना चाचणीचे किट्स, सॅनिटायझर आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांच्यासह तिघांनी कागदपत्रांमध्ये फेरफार आणि खोट्या नोंदी केल्या.
कोरोना चाचणीचे किट्स आणि औषधे वारजे येथील रुग्णालयात वापरण्यात आल्याचे राज्य सरकार आणि महापालिकेला कागदोपत्री दाखवले. त्यानंतर हे चाचणी किट्स, औषधे खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना विक्री करून ८० ते ९० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार १५६ (३) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.