समर्थ भारत वृत्तसेवा
निरगुडसर ता. १८ : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र, मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे तरुण वर्गही दूध व्यवसायाकडे वळला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने त्याचाही फायदा झाला होता; मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे.
सणासुदीच्या तोंडावर दूध दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. पशुखाद्याची दर वाढत असताना, दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुधाला प्रति लिटर ३९ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका दुध दर कपातीमुळे बसणार आहे. नव्याने धंद्यात उतरलेल्या तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे.दुध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असूनही गायीच्या दूध दरात कपात केल्याने संकट वाढले आहे.
प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चाएवढादेखील दर सध्या मिळत नाही. दुधाचा लिटरमागे दहा रुपये दर वाढला असला तरी प्रतिलिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, उत्पादन खर्च ५५ रुपये तर दुधाला मिळतात ३६ रुपये, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. (दिपक पोखरकर, सरपंच, पिंपळगाव)
दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटाका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी २७ रुपयांचा दर मिळत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय काहीच होणार नाही का? (हर्षद टाव्हरे, दुध उत्पादक शेतकरी)
प्रचंड वाढलेली महागाई यामुळे त्रस्त झालेल्या गायदूध उत्पादक शेतकऱ्याला दूध दराचा मोठा फटका बसत आहे. गेल्या तीन महिन्यांत गाय दूध दर प्रतिलिटर पाच रुपये घसरले आहेत. तसेच दिवाळीला दूध दरात आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांची दीपावली कडू झाली आहे. ३४ रुपये दर देण्याचा सरकारी अध्यादेश दूध संथानी केराच्या टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे, जून महिन्यात गाय दूध दराने ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.यावेळी शासनाने अध्यादेश काढून गाय दूध दर कमीत कमी ३४ रुपयांपेक्षा कमी द्यायचा नाही, असे स्पष्ट केले. परंतु आदेश काढल्यापासून दूध दरात टप्प्याटप्याने घट होत गेली. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी गाय दूध दर कमी झाले. तर दिवाळीत दरात आणखी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रचंड वाढलेले पशुखाद्याचे दर, चाऱ्याचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यातच सातत्याने दरातील घसरण आर्थिक गणित बिघडून ठेवत आहे. (पवन हांडे देशमुख, दुध उत्पादक शेतकरी)