आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यभरातील सगळ्याच पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा केल्याने शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
लोकशाही या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या एका वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने लोकसभेच्या ९ जागांवर दावा केला असून, शिरूर लोकसभा मतदार संघाचाही यामध्ये समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्यासह शिवसेनेचे (शिंदे गट) मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील नॉट रीचेबल!
आगामी लोकसभा निवडणुकी या महायुतीत लढविल्या जाणार असून शिंदे गट, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील जागावाटपात शिरूर लोकसभा मतदार संघ हा अजित पवार गटाकडे जाणार असल्याने आणि विद्यमान खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपसोबत जवळीक वाढल्याने? माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील राजकीय सोय म्हणून अजित पवार गटासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा असून याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद असून ते मतदार संघात नसल्याचे समजते आहे. त्यांच्या लांडेवाडी येथील कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी सदर वृत्ताबाबत आपणास माहिती नसल्याचे सांगितले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वी विद्यमान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. ते सलग तीन वेळा खासदार राहिलेले असून पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटात प्रवेश केला आणि आता अजित पवार गटात सहभागी होत असल्याच्या चर्चांना शिरूर लोकसभा मतदार संघासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.