मंचर प्रतिनिधी:
ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय.
दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या असल्यामुळे लाखो प्रवाशी शहरातून आपल्या मूळ गावी प्रवास करत असतात. अनेक बहिणी आपल्या भावाला ओवाळायला भावाकडे जात असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गेले अनेक दिवस विविध मार्गांवरील बस नियमित वेळेत न सोडणे, बस नादुरुस्त असल्याचे सांगून अचानक रद्द करणे, बसच न सोडणे अशा अनेक गोष्टींमुळे प्रवाशांचे मोठे हाल होतायेत.
मागील वर्षी मोठा डामडौल करत एस टीची मोठी जाहिरात करून प्रवाशांविषयी मोठी आपुलकी दाखवत राज्य सरकारने मोठमोठ्या जाहिराती केल्या होत्या, मात्र या वर्षी राज्यभरात प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील चास, नारोडी, साकोरे तसेच आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये एस टी बसच्या नियमित फेऱ्यांना कात्री लावल्याने या परिसरात देखील प्रवाशांना तासंतास तिष्ठत उभे राहावे लागत असून शेवटी सोबत आणलेले ओझे घेऊन रिकाम्या हाताने घरचा रस्ता धरावा लागत आहे.
पुढाऱ्यांच्या हुजऱ्यांनी संपर्क केल्यावर एस टी प्रशासन कामाला
सर्वसामान्य प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असताना या सर्वसामान्य प्रवाशांनी एसटी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अतिशय वागणूक दिली जाते. मात्र आम्हीच कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखविण्यात सतत मग्न असणाऱ्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या हुजऱ्यांचे फोन उचलून होय बा करण्यात धन्यता मानून एसटी प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे