समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर, ता. ८ : शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख आणि संपर्कप्रमुख ॲड. अविनाश राहणे यांचे आज सकाळी (दि. ८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने आंबेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
ॲड. अविनाश राहणे हे तब्बल चार दशके राजकारणात सक्रिय राहिले. त्यांचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांशी आपुलकीचे संबंध होते. पुणे जिल्ह्यासह आंबेगाव तालुक्यात ते सर्वसामान्य शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना निरपेक्ष भावनेने मदत करत असत. मंचर येथे त्यांनी शिवकल्याण पतसंस्था सुरू करून हजारो शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेला सहकार्य केले.
आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेशी असणारे त्यांचे ऋणानुबंध सर्वश्रुत आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने एका झंझावाती युगाचा अंत झाल्याची भावना शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.