घोडेगाव प्रतिनिधी:
भीमाशंकर येथे पुजाऱ्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. शिवलिंगावर अभिषेक, पुजा करुन फुले वाहणाऱ्या पुजारी गुरव यांच्यामध्ये पुजेच्या संधीवरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार भीमाशंकर मंदिर परिसरात घडला. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूच्या 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शंकर गंगाराम कौदरे (वय 65 रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (रा. भीमाशंकर, ता. खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातील 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांसमोरच हा प्रकार घडल्याने मंदिर प्रशासनाची मान शरमने खाली गेली आहे.
भीमाशंकर मंदिर गाभारा आणि परिसरात असलेल्या शनि मंदिरात पुजा करण्यावरुन पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी दुपारी भाविकांच्या रांग लागलेल्या असताना हा वाद विकोपाला गेला. एका गटाने पुजेला बसलेला पुजाऱ्यांना उठवून तिथला ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप, खुर्ची जे हातात येईल त्याने मारामारी सुरू झाली. या प्रकाराबाबात मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की पुजा चालू असताना पुजेत अडथळा आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. मात्र, यावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल. सर्व लोक आमचचे आहेत. असं सांगण्यात आले आहे.