समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव ता. १५ : चास (ता. आंबेगाव) येथे भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून गोड नैवेद्य भरवत आपल्या लाडक्या सर्जा राजाची गावातून वाजत गाजत आणि डीजेच्या दनदणाटात मिरवणूक काढली होती.
डीजे चालकाच्या दुर्लक्षामुळे डीजेचा धक्का लागून विजेचे दोन खांब वाकून त्यावरील विजेच्या तारा तुटल्या. काही उत्साही लोकांनी मोठ्या आवाजात लावलेल्या डीजेमुळे बैल सैरभैर होऊन उधळले. गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भागवत, फिरोज इनामदार, ग्रामपंचायत सदस्य संतोष रोकडे आणि या विभागातील वीज कर्मचारी अशोक भोर यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जर वीजपुरवठा तातडीने खंडित केला नसता तर तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला असता.
या घटनेमुळे गावातील अनेक सजग नागरिकांनी बैल पोळ्याला लावलेल्या डीजेवर नाराजी व्यक्त करत गावात डीजे बंदी करावी अशी मागणी केली आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सर्वांनाच त्रास होतो, मात्र विनाकारण वाद नको म्हणून यावर कुणी बोलत नाही. डीजेमुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि रुग्णांना तसेच हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या वयस्कर रुग्णांना प्रचंड त्रास होतो. प्राणी देखील या गोंगाटामुळे सैरभैर होऊन विचलित होतात. त्यामुळे गावात कायमस्वरूपी डीजेबंदी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.