राजगुरुनगर प्रतिनिधी:
मराठा आरक्षणासाठी उपोषणकरुन मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट राजगुरुनगर (खेड) या ठिकाणी सभा होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांची विराट सभा झाली. या सभेत त्यांनी आरक्षणासाठी आणखी दहा दिवस सरकारला दिले आहे. त्यापूर्वीच 20 ऑक्टोंबरला राजगुरुनगर येथे सभा होणार आहे.
पवारांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी जरांगे पाटील पहिल्यांदाच सभा घेणार आहे. याच सभेची जागादेखील ठरवण्यात आवी आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच सभा असणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
आंतरवाली सराटी सारख्या मराठवाड्यातील गावात ऑक्टोबर हीट असूनही लाखो लोकांनी गर्दी केली होती. नजर जाईल तिथपर्यंत मराठे एकवटले होते. यात सर्व वयोगटातील मराठे आंतरवाली सराटीत प्रवास करत दाखल झाले होते. तरुणांचादेखील यात मोठा सहभाग होता. हीच लाखोंची गर्दी आता खेडमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी 100
एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली.
24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचे आता 8 दिवस शिल्लक राहिले आहे. सरकराने आमच्याकडून 40
दिवस घेतले असून, या चाळीस दिवसांत त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा 24 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. यावेळी बोलता ना जरांगे म्हणाले की, "आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात विरोधकांनी उभं केलय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं. तर, सरकारने आमच्याकडे चाळीस दिवस घेतले आहे. त्यामुळे आरक्षण द्या, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला 5000
पानांचा आधार मिळाले असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. 40 दिवसांची मुदत संपल्यावर 24 तारखेनंतर होणार आंदोलन देखील शांत पद्धतीनेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.