मंचर प्रतिनिधी:
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय मराठा महासंघ, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या.
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष अँड सुनिल बांगर व अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी निषेध सभेचे आयोजन केले होते.
घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी सुरेश निघोट, अजय घुले, मालती थोरात प्रवीण मोरडे, विकास जाधव, नीलिमा टेमगिरे अशोक काळे उपस्थित होते.
जालना येथे घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत असताना अँड. सुनिल बांगर यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले शांतता मार्गाने न्याय हक्कासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी कार्यकर्ते उपोषण करत होते. सदरचे उपोषण राज्य सरकारने पोलीस बळाच्या ताकदीवर चिरडण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी अमानुषपणे महिला, युवक-युवती, लहान मुले यांच्यावर लाठीहल्ला केला. पोलीस बांधवाना आदेश देणारे कोण? गृहखते कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे राज्यातील जनतेला माहीत आहे. त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल.
जालना येथे लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. अशी मागणी वसंतराव बाणखेले यांनी केली.
सरपंच संगिता शेवाळे, प्रभाकर बांगर, लांडे, वसंतराव बाणखेले, सुरेखा निघोट, राजू बेंडे यांची भाषणे झाली. मंचर पोलीस ठाणे, घोडेगाव पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलन शांततेत पार पडले. गणेश खानदेशे यांनी आभार मानले.