मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द आहे. येथे पावसाळ्याच्या दिवसात चार दिवसांतून अर्धा तास पाणी मिळते. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अवसरी येथील गावकऱ्यांना नियमित शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून चार जलजीवन योजनांसाठी तब्बल 6 कोटी रुपयापेक्षा अधिक निधी खर्च होणार आहे. पण, त्यासाठी विहिरींना शाश्वत पाणी मिळावे म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खडकमळा-
इंदोरेवाडी, वायाळमळा- कराळेवाडी या वस्तीवरील योजनांच्या विहिरी मोरदरा पाझर
तलावाचा पायथ्याला व भोरवाडी योजनेची विहीर भोरमळ्यातील ओढ्यावर खोदली आहे. या
विहिरींसाठी पाणी उजव्या कालव्यातून दिले जाते. पण, पावसाने ताण
दिल्यामुळे मोरदरा पाझर तलाव आटला आहे. पाझर तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या
कामाला राज्य सरकारने निधी दिल्यास विहिरींना शाश्वत पाणी उपलब्ध होईल. याकामी
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गावकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे, असे
पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांनी दिली.
गावाला बाराही महिने दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी घोड नदीवरून चार किलोमीटर अंतरावरून लोखंडी पाईपलाईनद्वारे पाणी योजना करणे गरजेचे होते, असे महिलांनी सांगितले
अवसरी खुर्द गावठाण व वाड्यावस्त्यावरील लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे. घोड नदीवरून पाणी आणल्यानंतर येणारे दरमहिन्याला नळ योजनेचे वीजबिल फार मोठ्या प्रमाणात येत होते. ते बिल कोणत्या वस्तीने किती भरावे, याचा ताळमेळ लागला नसता. एवढे बिल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे गावातील वाड्यावस्त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जलजीवनअंतर्गत नळ योजनांची कामे मंजूर झाली. सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाऊस झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.