समर्थ भारत वृत्तसेवा
नारायणगाव ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या शिवजन्मभूमीत (ता.जुन्नर) जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर उभे राहणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. त्यासाठी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोदरे (ता.जुन्नर) गावातील २५ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात २९ तारखेला सर्वात मोठी घोषणा होणार असल्याचे होर्डिंग लावले होते. त्यामुळे सर्वात मोठी कोणती घोषणा होणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर निर्माण करताना प्राचीन पद्धतीचे भव्य दिव्य महाद्वार व तटबंदी बांधण्यात येणार आहे. महाराजांच्या जीवनावर आधारित सुसज्ज ग्रंथालय, शिवभक्तांसाठी भोजनालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभा मंडप, संग्रहालय, लेझर वॉटर शोसाठी ॲम्पी थिअटर, छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर व महाराजांची सुवर्णमूर्ती यासह अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची उभारणी करताना गोदरे (ता.जुन्नर) गावाची निवड करण्यात आली असून अंदाजे एक लाख स्क्वेअर मीटर मध्ये मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. मंदिराचे वातावरण अनुकूलित ठेवण्यासाठी भारतीय प्रजातीचे वृक्ष रचना व उद्यानाचे सुशोभीकरण, सिंहासनधारी सुवर्ण मंदिर ते महाद्वारापर्यंत जिवंत पाण्याचा प्रवाह, पाण्याच्या कारंज्यांसोबत मंदिराच्या मुख्य द्वारावर धावते अश्व पुतळे, मंदिर परिसराला भव्य तटबंदी, सुवर्ण मंदिर व महाराजांच्या पुतळ्याचे प्रेक्षणीय अवलोकन करण्याकरिता दालन, जगातील सर्वात उंच भगवा ध्वज व भारतीय मूर्तिकार जे.जे स्कूल ऑफ आर्टचे प्रा. पवार हे मूर्तीची निर्मिती करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची निर्मिती करण्यासाठी श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माजी आमदार शरद सोनवणे काम पाहणार असून ट्रस्टवर अठरा पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. सुवर्ण मंदिराची निर्मिती राजकारण विरहित असून सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामांच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल, मा.जि.प. सदस्य गुलाब पारखे, नेताजी डोके, सचिन वाळुंज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या चार मोठ्या घोषणा
• एक वर्षाच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा शंभर फूट उंचीचा पुतळा उभा करणार.
• छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले सुवर्ण मंदिर निर्माण होणार.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे सर्वात मोठा ८० मीटर उंचीच्या भगव्या ध्वजाची उभारणी.
• आळेफाटा येथे सर्व सोयींनी युक्त सर्वात मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार.