मंचर प्रतिनिधी:
मंचर ता. आंबेगाव येथे हरीओम कॉम्प्लेक्स मधील गाळ्यामध्ये गौरव चंद्रकांत रोडे यांचे स्वागत जेन्ट्स शॉपी नावाचे कपड्याचे दुकान आहे. रोडे हे रात्री दुकान बंद करुन घरी गेले होते. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाचे कार्यकर्ते जवळच असलेल्या मराठी शाळेच्या मैदानात दहीहंडीचा सराव करत होते. त्यावेळी अचानक मोठा आवाज होऊन आरडा ओरडा झाला. युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता दुकानातून धूर येताना दिसला.
त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान दाखवत राखत शटर उचकटून पाहिल्यास आत मध्ये आग लागली होती. त्यांनी तात्काळ दुकानासमोरील पाण्याच्या टाकीतील पाणी बादलीने काढत पेटलेल्या आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. पाऊण तास आग विझवत होते. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व कपडे व फर्निचर जळून खाक झाले होते. ही आग दुकानात असलेल्या वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि गावातील तरुणवर्ग घटनास्थळी दाखल झाले.