समर्थ भारत वृत्तसेवा:
मंचर ता. ३० : मंचर (ता. आंबेगाव) येथील गांजाळे मळ्यात राहणाऱ्या संध्या गांजाळे या मंगळवारी (दि. २९) रक्षाबंधनच्या निमित्ताने थिगळस्थळ (राजगुरूनगर) येथे गेल्या होत्या. रक्षाबंधन झाल्यानंतर बुधवारी (दि. ३०) पुन्हा सासरी येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत असणाऱ्या तब्बल सव्वा लाखाचे दागिन्यांची चोरी केली आहे. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे.
संध्या गांजाळे (वय ४२, मंचर ता. आंबेगाव जि.पुणे) आपल्या सासरी परतत असताना, राजगुरूनगर येथून निघालेल्या बसने मंचर स्थानकावर उतरल्या. त्यानंतर घरी गेल्यावर त्यांना आपल्या पिशवीत ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह दागिन्यांची शोधाशोध करुनही दागिने सापडले नाहीत, म्हणून त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात याविषयी करायदेशिर तक्रार दिली आहे. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅम वजनाचा अंदाजे ५० हजार रुपयांचा लक्ष्मीहार आणि १५ ग्रॅम वजनाचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नेकलेस आहे.
दरम्यान मंचर पोलिसांनी काही संशयित महिला आरोपींना ताब्यात घेतले असून; या महिला बस स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या असून; बस स्थानक परिसरातील होणाऱ्या चोऱ्यांमध्ये त्यांचा काही सहभाग आहे का या बाबत पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.