समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर, ता. १९ : मंचर येथील अमरनाथ हाईटस लगत महावितरण कंपनीच्या दोन डी.पी. असून; आता अजून एका डी.पीच्या उभारणीचे काम सुरु आहे. या तिन्ही डी.पी.साठी महावितरण कंपनीच्या मंचर सुपर मार्केट मागील डी.पी. पासून ११ केव्हीच्या भूमिगत केबलने वीज पुरवठा प्रस्तावित आहे. या कामातील केबल अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
सदर केबल्स अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने तसेच निर्धारित खोलीपर्यंत योग्य काळजी घेऊन न गाड्ल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असून; महावितरण कंपनी शाळकरी मुलांच्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि युवा नेते स्वप्नील बेंडे यांनी केला असून कंपनीने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी देखील केली आहे.
सदर वीजपुरवठा करतेवेळी खोलवर गाडून पाईप मध्ये केबल टाकून काम करण्याऐवजी जमिनीपासून सुमारे अर्धा फुट खोलवर कोणत्याही पाईप मधून ही केबल टाकलेली नाही. सदर केबल खोलवर न गाड्ल्यामुळे मंचर नगरपंचायच्या वतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दरम्यान दोन वेळा या केबलला जे.सी.बी.च्या बकेटचा धक्का लागून केबल खराब होऊन येथील रहिवाश्यांना ऐन मोहरमच्या दिवशी अंधारात राहावे लागले होते.
या केबल मधून होणारा विजेचा प्रवाह हा ११ के.व्ही. इतका जास्त असल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. याबाबत नगरपंचायत आणि ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे लेखी पाठपुरावा करूनही अध्याप सदर भूमिगत वीजवाहिनीची केबल खोलवर पाईप मध्ये पुरून टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
शाळकरी मुलांसह नागरिकांना धोका
मंचर सुपर मार्केटमागील रस्त्यावर जवपास २०० मीटर उघडयावर ही केबल आहे. या केबल वरून सर्व दुचाकी व चारचाकी ये जा करतात. तसेच जवळपास ५०० रहिवाशी आजूबाजूला राहतात. जिल्हा परिषद शाळा शेजारी असल्यामुळे शाळेतील लहान मुले त्या रस्त्याने ये जा करत असतात. गावात येण्यासाठी तो रस्ता असल्यामुळे दररोज दोन ते तीन हजार लोकांची रस्त्यावरून ये- जा सुरु असल्याने मोठा अपघात होऊ शकतो. या गोष्टीची कल्पना असूनही पूर्वीचा कंत्राटदार आणि महावितरण कंपनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित कंत्राटदाराने आणि महावितरण कंपनीने लवकरात लवकर काम सदर उघडयावरील असणारी वीज वाहिनीची केबल पाईपमधून खोलवर पुरून काम पूर्ण करून द्यावी. या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या आणि शाळकरी मुलांच्या आरोग्याशी संबंधित कंत्राटदाराने आणि महावितरण कंपनीने चालविलेला खेळ त्वरित थांबवावा. सदर काम निर्धारित वेळेत पूर्ण करून द्यावे अन्यथा महावितरण आणि संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. (स्वप्नील बेंडे, मा. सदस्य, मंचर ग्रामपंचायत)