जुन्नर प्रतिनिधी:
मासेमारी करण्यासाठी माणिकडोह धरणाच्या
(ता. जुन्नर) जलाशयात गेलेल्या आदिवासी ठाकर समाजातील कैलास शंकर जाधव (वय ४५, रा.
खामगाव-शिवेचीवाडी, ता.
जुन्नर) यांचा मृतदेह तीन दिवसानंतर शुक्रवारी (ता. २१) सकाळी पाण्यावर तरंगताना
आढळून आला.
कैलास
जाधव हे मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांचे कपडे, चप्पल काठावर
आढळून आले होते, तर
मासेमारीसाठीची रबरी ट्यूब पाण्यावर तरंगत होती. त्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची
शंका व्यक्त होत होती. खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी पोलिस, तहसील जलसंपदा, तसेच आपत्कालीन
विभागास याबाबत माहिती दिली होती. स्थानिक रेस्क्यू पथक व ग्रामस्थांनी दोन दिवस
पाण्यात गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.
घटनास्थळी तहसीलदार रवींद्र
सबनीस यांनी भेट दिली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी
पाणबुडीच्या साहाय्याने शोघ घेण्याची मागणी केली होती. मात्र, तीन दिवसानंतर
शुक्रवारी जाधव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
दरम्यान, तालुक्यातील
धरणाच्या पाणीसाठ्यात बुडाल्याच्या घटना वारंवार घडतात यासाठी अत्याधुनिक
आपत्कालीन व्यवस्था तालुक्यात असावी,
अशी
मागणी अजिंक्य घोलप यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अंत्यसंस्कारानंतर
दिला पेपर मृत
कैलास जाधव यांचा मुलगा सूरज हा महाविद्यालयात शिक्षण घेत असून, शुक्रवारी सकाळी
वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने आपले दुःख बाजूला ठेवत कला
शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेचा पेपरही दिला.