समर्थ भारत वृत्तसेवा
पेठ (दिलीप धुमाळ)
खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कलमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी, सातगाव पठार भागातील सिलिंग हटवण्यासाठी तसेच हुतात्मा बाबू गेनु जलाशयातील (दिंभे धरणातील) जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात घेऊन जाण्याच्या शासन निर्णयाविरोधात सातगाव पठार व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज (दि. १८) पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पंचवटी ढाबा, पेठ येथे शिवसेना गट नेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
उपस्थित शेतकऱ्यांना रविंद्र तोत्रे, ग्रामपंचयत सदस्य संजय पवळे अशोक धुमाळ, भाऊ सावंत, संजय कराळे, अशोक राक्षे, मोहन काळे, बी.आ. कराळे, गणपतराव कराळे, मोहन काळे, प्रशांत पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी ३५ वर्ष सातगाव पठार भागाला कलमोडी पाणी मिळालं नाही तसेच सातगाव भागातील जमिनींना सिलिंग असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडीअडचणीचा सामना करावा लागतो या विषयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
शेवटी शिवसेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आता जर न्याय मिळाला नाही तर; यापुढे कलमोडी धरणामध्ये जलसमाधी घेऊ. असा इशारा शासनाला दिला. यावेळी नायब तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, घोडेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, आणि अन्य पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साठ पोलीस कर्मचारी, सातगाव पठार भागातील सर्व पोलीस पाटील यांचा चोख बंदोबस्त ठेवला.