घोडेगाव प्रतिनिधी:
सर्पदंश झाल्यास रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नये, अघोरी उपायांमुळे सर्पदंशाचा रुग्ण दगावू शकतो. त्यास धीर देऊन त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे,’ असे आवाहन सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले.
घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळेत न्यूक्लीअस बजेट योजना २०२३ अंतर्गत उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राऊत बोलत होते.
डॉ. राऊत यांनी सांगितले की, सर्पदंश हा शेतीसंबंधी होणारा गंभीर अपघात असून, तातडीने उपचार केल्यास रुग्णाचा प्राण वाचू शकतो, सर्पदंश टाळण्यासाठी शेतात काम करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यास उदा. बूट वापरणे, पूर्ण अंगावर कपडे घालणे, रात्रीच्या वेळी अंधारात हातात काठी व बॅटरीच्या उजेडात चालणे, फळबागेत काम करताना डोक्यात टोपी घालणे, रात्रीच्या वेळी जमिनीवर न झोपता कॉटचा वापर करणे, आदी साधे प्रयोग केले, तरी सर्पदंशाचे प्रमाण कमी होऊ शकते.
आपल्या परिसरात आढळणारे नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चारही साप अतिविषारी असून, यांच्या दंशानंतर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे असते. नाग आणि मण्यार यांच्या विषाने रुग्णांच्या मेंदू व हृदयावर दुष्परिणाम होतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. रुग्णास कृत्रिम श्र्वासोस्वाची गरज लागते. घोणस व फुरसे चावल्यानंतर रक्त गोठ्ण्याची प्रक्रिया लांबते व रक्ताच्या उलट्या, जुलाब होतात, लघवीवाटे रक्त जाते, रक्तदाब कमी होतो, असेही डॉ. राऊत यांनी नमूद केले.
यावेळी ‘शून्य सर्पदंश मृत्युदर प्रकल्प’ हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. तसेच सर्पदंश विषयीचे माहितीपत्रक आणि साहित्य, स्मार्ट बँडेज विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. डॉ. पल्लवी राऊत यांनी सर्पदंश झाल्यानंतरच्या प्रथमोपचाराविषयी माहिती देऊन बँडेज वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.