घोडेगाव प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील कानसे येथील अजय शशिकांत कराळे वय वर्ष 23 या हा युवक जंगलात रानभाज्या काढण्यासाठी गेला होता. या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अजय कराळे,अक्षय कराळे व संतोष चपटे असे तिघे मिळून डोंगरामध्ये चाव्याचे कोंब व कोळूची भाजी काढण्यासाठी गेले होते.
पाऊस पडत असल्याने डोंगर वाटा व कडे निसरडे झाले होते. यामध्ये एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो 25 ते 30 फूट खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला व हात फॅक्चर झाला.
सोबत असल्या दोघा मित्रांनी त्याला तात्काळ डोंगरावरून खाली आणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा आधीच अजय कराळे याचा मृत्यू झाला होता.अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असल्याचे आंबेगाव तालुका बाजार समिती संचालक संदीप चपटे यांनी सांगितले.