मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा 2 लाख 84 हजार 923 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी मंचर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अस कि लक्ष्मीबाई अशोक शिंदे वय ५८ वर्ष यांनी स्वतःच्या घरात दागिने आणि रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती. घराला बाहेरून कुलूप लावून त्या शेजारच्या खोलीत झोपल्या होत्या. सोमवारी सकाळी उठल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी घरात जाऊन पहिले असता पर्समधील ऐवज चोरीला गेल्याचे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. लक्ष्मीबाई शिंदे यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. ताबडतोब घटनास्थळी पोलिस हवालदार तानाजी मांडवे व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे यांनी भेट देवून तपास सुरू केला आहे. पाळत ठेवूनच चोरी झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असून बंद घर चोरटे टार्गेट करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.