आणे प्रतिनिधी:
आणे (ता. जुन्नर) येथून सुमारे चार किलोमिटर अंतरावर असलेल्या पेमदरा गावच्या हद्दीतील महान डोंगर परिसरात खंडू रामभाऊ दाते यांच्या शिवारात एक मृतदेह बुधवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला आढळून आला. त्याने ही माहिती पेमदरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील दाते दिली. त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात खबर दिली असता पो. उ. नि. अनिल पवार त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवता येण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांनी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड व त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. फड यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वी मृत झाली असून मृतदेह ओळखण्याच्या अवस्थेत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे प्रथमदर्शनी सांगता येत नाही. आणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. असीम आतार हे त्यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पो.उ. नि. अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. विकास गोसावी, पो.ना. अमित पोल, पो. कॉ. लोहोटे अधिक तपास करत आहेत.