मंचर प्रतिनिधी:
वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून तिचा खून केल्याची खळबळजनक आणि दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली. अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय वर्ष ७८) असे खून झालेल्या वृद्धेचे महिलेच नाव असून ओळखीच्या कामगारानेच तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पांढरीमळा मंचर येथे अंजनाबाई प्रभाकर बाणखेले या घरी एकट्याच राहतात. त्यांची तीन मुले मुंबई येथे असतात. एक ओळखीचा कामगार बाणखेले यांना नेहमीच मदत करण्यासाठी घरी येत असे. बाणखेले यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. त्यांच्यावर या कामगाराची नजर होती. सोमवारी दुपारी दोन वाजता अंजनाबाई बाणखेले या घरातून निघून गेल्या. मुंबईतून मुलाने फोन केला मात्र तो बंद लागल्याने त्यांनी शेजाऱ्यांना शोध घेण्यास सांगितले रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत विष्णू बाणखेले यांनी त्या हरवल्याची तक्रार मंचर पोलिसात दिली. येथून जवळच उजवा कालवा गेल्याने तेथेही शोध घेण्यात आला. संबंधित कामगाराने उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका व्यक्तीला दागिने दिले होते. ही गोष्ट समजल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या कामगाराला फोन केला असता त्याने परराज्यात असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. संशय बळवल्यानंतर कसून चौकशी केली असता वृद्ध अंजनाबाई बाणखेले यांचा खून झाल्याचे सिद्ध झाले.
मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, वसंतराव बाणखेले, रवींद्र गांजाळे व पोलीस पथकाने शोध घेतला असता घरापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल चोरून नेण्यात आले होते. तसेच मातीत तोंड दाबून तिचा खून केला होता. हातातील पाटल्या काढता न आल्याने त्या तशाच राहिल्या होत्या. मंचर येथील रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतू मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. मंचर पोलिसांनी पंचनामा केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.