नारायणगाव प्रतिनिधी:
जुन्नर तालुक्यात अवैधरित्या वाळू व मुरूम उत्खनन व वाहतुकीस महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याचे आ. अतुल बेनके यांनी म्हटले आहे. राज्यातील सरकार बदलल्यामुळे अधिकारी मस्तवाल झाले असून पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना सरकारचे अभय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार पोलीस व महसूल विभागाला सूचना केल्यानंतरही त्यांचे प्रमुख खालील अधिकाऱ्यांना आदेश सोडतात, आणि त्यांचेच बगलबच्चे, एजंट, पक्षाचे नेते संगनमताने असे भ्रष्ट व्यवहार करीत आहे. पत्रकार जेव्हा बातमी करतात तेव्हा दडपशाही केली जाते.
महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी एजंट नेमलेले असून महसूलचे काही अधिकारी हप्ते घेऊन मुरुमाची बेकायदा वाहतूक करण्यास परवानगी देत आहेत. बेकायदा मुरूम, वाळू वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही तर तुझी गाडी सोडणार नाही अशी धमकी देतात.
महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी एजंट नेमलेले असून महसूलचे काही अधिकारी हप्ते घेऊन मुरुमाची बेकायदा वाहतूक करण्यास परवानगी देत आहेत. बेकायदा मुरूम, वाळू वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही तर तुझी गाडी सोडणार नाही अशी धमकी देतात.
अधिकाऱ्यांनी हप्ते वसुलीसाठी पेटीएमचा एक नंबर दिला असून त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले जाते. अधिकाऱ्यांच्या चालू असलेल्या भ्रष्ट कारभाराची, एजंटची व पेटीएम नंबरची माहिती माझ्याकडे असून लवकरच ती उघडकीस आणणार आहे. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला हा गैरप्रकार मान्य नसून काही लोकप्रतिनिधी हप्ते घेण्यासाठी टक्केवारीचा वापर करीत असतील तर माझा त्याच्याशी संबंध नाही. मी अशा प्रकारचे व्यवहार करीत नसून जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन चुकीच्या गोष्टी करीत असतील तर त्याला माझा विरोध आहे. (अतुल बेनके, आमदार, जुन्नर)
उत्खनन करण्यासाठी परवाने दिले असून काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. सर्व तलाठी, मंडल अधिकारी यांना परवाना नसलेल्या ठिकाणी उत्खनन होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त तालुक्यात गैरप्रकार चालू असल्यास आणि आमदार साहेबांनी त्यांच्याकडे असलेली माहिती माझ्या निदर्शनास आणून दिल्यास चुकीच्या गोष्टींना तात्काळ पायबंद घालता येईल. (रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर)