शिक्रापूर प्रतिनिधी:
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जायचे असताना शासनाची १०८ रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचे समोर आले आहे.
तळेगाव ढमढेरे येथील
घडलेल्या घटनेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काकडे
यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा बळीराम माने हि विठ्ठलवाडी येथील बावीस वर्षीय
महिला मंगळवार २३ मे रोजी प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेली
होती, दुपारी
महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाचे वजन तीन किलो तीनशे ग्राम होते, मात्र बाळाचे हृदयाचे ठोके मिनिटाला तीस दरम्यान होते, त्यामुळे निवोनेटल रिसस्कीटेशन द्वारे हृदय सुरु करण्यात आले, परंतु बाळाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला
तीन वेळा संपर्क केला.
त्यावेळी ऑक्सिजन उपलब्ध असणारी रुग्णवाहिका नसल्याचे सांगत दीड तासाने रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे सांगण्यात आले, मात्र त्यांनतर ऑक्सिजनची सोय असणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या बाळाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असताना तेथील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर या घटनेमुळे बाळाची आई नेहा माने यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना प्रथम शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व नंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य
केंद्राच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले – रेखा बांदल
तळेगाव ढमढेरे येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडलेल्या प्रकारामध्ये डॉक्टरांची काही चूक नसून
त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले तसेच त्यांना शिक्रापूर येथील खाजगी डॉ. शरद लांडगे
व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी देखील मोलाची मदत केली तसेच टीमने खाजगी
रुग्णवाहिकेतून बाळाला पुण्याला हलवले परंतु ऑक्सिजनची १०८ रुग्नावाहीला वेळेत न
मिळाल्याने सदर प्रकार घडला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी
सांगितले.