समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर, ता. २७ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपला. उद्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तालुक्यातील विविध केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवदत्त निकम यांच्या बंडखोरीनंतर बाजार समितीच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर महाविकास आघाडी आणि देवदत्त निकम यांच्या पॅनलने जोरदार प्रचार केला. सेना भाजपही प्रचारात आघाडीवर राहिली. त्यानंतर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
माजी सभापती देवदत्त निकम यांनी मतदारांच्या घराघरात बांधावर आणि शिवारात जाऊन प्रचार केला. सेना (शिंदे गट) भाजप आणि स्वाभिमानीच्या वतीनेही अरुण गिरे यांनी घराघरात जाऊन प्रचार केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनी विविध गावातील आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून मतदारांना चौकात बोलवून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना संपर्क केला. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या मतदार चौकात जमविण्याच्या आग्रहाखातर गावातील कार्यकर्त्यांनी मतदार कमी आणि कार्यकर्तेच जास्त जमवले. नेते मंडळींनी देखील याच कार्यकर्त्यांसमोर भाषण ठोकून पुढचे गाव गाठण्याचा कार्यक्रम राबविला.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि देवदत्त निकम यांचे पॅनल अशी तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून, निवडणुकीचे वातावरण तापविले. माजी सभापती देवदत्त निकम यांच्यामुळे धास्तावलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जोरदार प्रचार केला. सेना (शिंदे गट) भाजपच्या वतीने देखील मतदारांना परिवर्तनाचे स्वप्न दाखवत जोरदार प्रचार करण्यात आला.
प्रचारानंतर
लक्ष्मीदर्शनाची रात्र?
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर, अनेक मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाला असल्याचे बोलले जात असून, हे लक्ष्मीदर्शन रात्री पार पडले. सोसायटीसाठी ३ हजार आणि ग्रामपंचायत साठी २ हजार तर काही मतदारांना १ हजाराप्रमाने लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा आहे.
मतदान न करण्याची
शपथ देऊन लक्ष्मी दर्शन?
मतदारांकडून
लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊनही योग्य उमेदवारालाच मतदान!
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या उमेदवाराला मतदान न करण्यासाठी प्रत्येक मतदाराला १० हजार देऊन शपथ दिल्याची चर्चा असून, मतदारांनी देखील लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊनही त्यांनाच मतदान करणार असल्याचे बोलले जात आहे.
मत विक्री करायला
भाग पाडणाऱ्यांनाच धडा शिकवणार
स्वतःच्या
फायद्यासाठी पैसे देणाऱ्यांशी कुठला इमान?
ज्या लोकांनी चांगल्या उमेदवाराला पाडण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन दिले, त्यांनी कुठे कष्ट करून आणि घाम गाळून लक्ष्मी दर्शन दिले आहे? बेईमानी करूनच त्यांनी आम्हाला लक्ष्मी दर्शन दिले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर घेतलेली शपथ किंवा त्यांच्याशी ठेवलेला इमान याला काहीही अर्थ नाही. आम्ही लक्ष्मी दर्शन घेऊनही चांगल्याच उमेदवाराला मतदान करणार असे मत लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेतलेल्या अनेकांनी व्यक्त केले आहे.