समर्थ भारत वृत्तसेवा
शिरूर / शिक्रापूर ता. २७ : शिरुर शहरातील प्रितम प्रकाशनगर येथील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीमध्ये इसमाला जुन्या गुन्ह्यात जामीन करून दिल्याचे पैसे मागत त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करत इसमासह त्याच्या पत्नी व मुलीला जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे शरद तुकाराम बांदल याच्या सह त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर शहरातील प्रितम प्रकाशनगर येथील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीमध्ये अंकुश बांदल हे त्यांच्या पत्नी व मुलीसह असताना शरद बांदल हा त्याच्या तीन साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या वेरना कारमधून आला आणि अंकुश यांना मी तुझा जुन्या गुन्हयात जामीन करून दिलाय त्याचे पैसे मला आत्ताचे आत्ता पाहीजेत. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून अंकुश बांदल यांना जिवे मारण्याचे हेतूने हातातील चाकूने अंकुश यांच्या तोंडावर, डोक्यात वार केले तर शरद यांच्या साथीदारांनी लाकडी स्टंपने अंकुश यांना मारहाण केली. यावेळी अंकुश यांची पत्नी मनीषा व मुलगी श्रेया मध्ये आले असताना मारहाण करणाऱ्या चौघांनी त्यांना देखील मारहाण केली.
सदर घटनेत अंकुश सुदाम बांदल, मनिषा अंकुश बांदल व श्रेया अंकुश बांदल (सर्व रा. करडे ता. शिरुर जि. पुणे) हे जखमी झाले असून याबाबत अंकुश सुदाम बांदल (वय ४१ वर्षे रा. करडे ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी शरद तुकाराम बांदल (रा. करडे, ता. शिरूर जि. पुणे), कैलास ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्यासह त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.