समर्थ भारत वृत्तसेवा.
बनकर फाटा, ता.२७ : उदापूर येथील कुलवडेमळा, अमुपमळा, मोरेशेत, चौधरी वाडी, या वाड्या वस्त्यांवर बिबट्याने गेली आठ ते दहा दिवसांपासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे सहा दिवसांपूर्वीच अमुपमळा येथील हनुमंत अमुप यांच्या वासरावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला होता. तेव्हापासून या परिसरात बिबट्याने ठाण मांडले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहे.
दिनांक २७ रोजी भर दुपारीच कुलवडे मळा येथील भेंडीखाली संजय चोरआंबले यांचा मेंढ्यांचा कळप सावलीला बसला असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला यावेळी प्रसंगअवधान राखत मेंढपाळाने बिबट्याच्या दिशेने काठी भिरकावली आणि आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु यात एक मेंढरू व वासरू हे किरकोळ जखमी झाले आहे.
याबाबतची माहिती वन अधिकारी वैभव काकडे यांना दिली असता यांनी तातडीने घटनास्थळी टीम पाठवून पाहणी केली व अमुपमळा येथे पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच कुलवडेमळा येथील संदीप कुलवडे, संपत कुलवडे, सचिन कुलवडे, अनिकेत सस्ते, या ग्रामस्थांनी देखील पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.