पारनेर : प्रतिनिधी
पुढील महिन्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या उद्धव ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकाने
उमेदवारीची मागणी केली तर त्याचा आम्ही विचार करू असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके
यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
मंगळवारी पारनेर येथील आनंद लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा
मेळावा पार पडला. त्यावेळी आ. लंके हे बोलत होते. यावेळी अशोक सावंत, बाबाजी तरटे, सुदाम पवार, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष विजय औटी, किसनराव रासकर,खंडू भुकन, डॉ. आबासाहेब खोडदे, रा. या. औटी, बा. ठ. झावरे, इंद्रभान गाडेकर, मारूती रेपाळे, नंदकुमार देशमुख यांच्यासह मोठया
संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना लंके म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आपणास सर्व १८
जागा निवडून आणायच्या आहेत. इच्छुकांची संख्या मोठी आहे. तालुक्याच्या सर्व
भागांमध्ये उमेदवारी द्यावी लागेल. मागील निवडणुकीत झालेल्या चुका दुरूस्त करून
यावेळी त्या होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांच्या
परिवारातील आपण सदस्य आहोत. एकदिलाने निवडणूक लढवू व निवडणूकीत विजयश्री खेचून आणू
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूकीसाठी परस्पर अर्ज दाखल करू नका, जे कोणी परस्पर अर्ज दाखल करतील त्यांनी
त्यांचा अर्ज ठेवायचा की काढायचा याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. पक्षाच्या
प्रक्रियेतून दाखल करण्यात आलेला अर्जच अधिकृत समजला जाईल. प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, रा.या. औटी, बा. ठ.झावरे यांनी अर्ज
भरण्यासंदर्भातील नियोजन करण्याची सुचनाही आ. लंके यांनी केली.
प्रसंगी मला विरोध करा, तुम्ही एकत्र रहा:-
राजकारणामुळे भावा-भावांमध्ये वाद करू नका.
एकत्र रहा असा सल्ला देताना आ. लंके म्हणाले, एकवेळ
मला विरोध करा मात्र तुमच्यातला वाद मिटवून घ्या. आपल्या राजकारणासाठी गावागावांत, घराघरात वाद लावायचा नाही. संघर्ष
थांबला पाहिजे. दोघांमधील वादामुळे होणाऱ्या विभाजनाचा फायदा काही राजकारणी
घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ देऊ नका असे ते म्हणाले.
त्यांची इच्छा असेल तर...
महाविकास आघाडीतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातील कोणाही इच्छुकास आपल्या मंडळाकडून निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्यांचा विचार करू. ज्यांचा तालुक्यातील वातावरण संघर्षशिल ठेवायचे आहे ते आपल्याकडे येणार नाहीत. ते त्यांचा निर्णय घेतील. आपण जिंकणारच आहोत. परंतू समोरच्याने दहा वेळा विचार केला पाहिजे की इतका फरक झाला कसा ? असेही लंके यांनी सांगितले.