समर्थ भारत वृत्तसेवा
रांजणगाव गणपती, ता. ३०: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तपासा दरम्यान त्याने वेगवेगळ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अजुन तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे रविंद्र गंगाराम डांगे यांचे जय मल्हार ट्रेडर्स नावाच्या किरणा दुकान असुन (दि. 19) मार्च रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटुन दुकानातील 65 हजार 500 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला होता. याबाबत रविंद्र डांगे यांच्या फिर्यादीवरुन (दि 20) मार्च रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास करण्याबाबत रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील पोलिसांना सुचना दिल्यानंतर तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार वैभव मोरे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत परिसरातील CCTV कॅमेरे चेक करुन तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीस तात्काळ अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्याने वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक चारचाकी तवेरा गाडी, खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 मोकळे गॅस सिलेंडर आणि हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक मोटार सायकल चोरली असल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.