घोडेगाव प्रतिनिधी :
भिमाशंकर मधून दर्शन घेऊन मंचरकडे परतत असताना मोटार सायकलहून येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मंचर- भीमाशंकर रस्त्यावर शिनोली गावाजवळ झाला.
ओमकार उमेश सुमंत वय २०, रा. शनिवार पेठ, सातारा असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर सागर संतोष उगळे (वय २०, रा. काळजंबा वाशिम), नईम यासीद नदाफ (वय २० रा.कोतळी ता.शिरोळ, कोल्हापूर) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी असल्यामुळे शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी मोटरसायकल वरून पहाटे लवकरच भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर परतत असताना शिनोली गावामध्ये एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली.
स्थानिक गावकऱ्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रवींद्र सुरकुले व नीलेश तळपे यांच्यामदतीने सुरुवातीला अपघातग्रस्तांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुण्याला उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती कळविली आहे. पिकअप गाडीला मोटरसायकलचा धक्का बसल्याने अपघात झाल्याचा संशय आहे. अपघाताची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जीवन माने यांनी दिली.