पुणे प्रतिनिधी:
मुलांना घरी शिकवण्यासाठी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला
लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर मात्र त्याने लग्नासाठी नकार दिला. या कारणामुळे २१
वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय. प्रियांका यादव
(वय. २१ वर्ष) रा. उत्तमनगर, पुणे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत
मृत तरुणीचा भाऊ प्रशांतकुमार दिलीप यादव (वय. २५ वर्ष) रा. मोरसा रेसिडेन्सी,
उत्तमनगर याने फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण
प्रियंका बीएमसीसी महाविद्यालयात एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. ती एनडीएमध्ये दोन
आर्मी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एक वर्षापासून त्यांच्या मुलांचा क्लास घेत होती.
२५ मार्च रोजी ती सकाळी उठली. आईला जेवायला वाढ असे म्हणून साडेदहा वाजता आंघोळ
करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या आईने
दरवाजा वाजविला, तरी तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा फिर्यादीने दरवाजा तोडला
असता तिने पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास
घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांना बाथरूममध्ये चिठ्ठी मिळाली. त्यात गुरींदरसिंग याच्याबरोबर ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. परंतु काही दिवसानंतर त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिले होते. तिच्या मोबाइलचा पासवर्ड चिठ्ठीत दिला होता. त्यावरून मोबाइलमधील फोटो पाहिल्यावर याच गुरींदरसिंग याच्या मुलांना ती शिकवायला घरी जात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक चवरे तपास करीत आहेत.