समर्थ भारत वृत्तसेवा
घोडेगाव, ता. २९: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टयातील गंगापूर खुर्द येथे मंगळवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास एका बिबट्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका म्हशीवर हल्ला करून तिला ठार केले. गंगापुर खुर्द परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असून अधूनमधून या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्जुन भिमाजी नरवडे या शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन वर्षे वयाच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस मृत्यूमुखी पडली असून यात या शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या अगोदर काही दिवसांपूर्वी बबन बाबूराव ठोसर यांच्या घराशेजारील गोठ्यातूनही अगदी अशाच प्रकारे म्हशीचं एक रेडकू बिबट्याने ठार केले होते. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. तसेच गावातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीला गंगापूर पंचक्रोशीत शेतीकामे आणि कांदा काढणीची लगबग सुरू आहे याचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करून बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी सरपंच कविता सातकर, उपसरपंच पांडुरंग ठोसर व ग्रामस्थांनी केली आहे.
आदिवासी बांधवांना बिबट्याच्या
हल्ल्याची भीती
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात यापूर्वी बिबट्याचा वावर नव्हता. परंतु अलीकडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून आदिवासी भागातील नागरिकांवर हल्ले होऊ शकतात. घोडेगाव येथे वनपरिक्षेत्र कार्यालय असून येथील अधिकाऱ्यांनी फक्त जनजागृती न करता या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.