समर्थ भारत वृत्तसेवा
मांडवगण फराटा, ता.२८: इनामगाव (ता. शिरूर) येथे न्हावरे तांदळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्याने पायी जाणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या अपघातात एक जेष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मुत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव तुलसी यादव असून किसन आल्हाट (वय. ५५ वर्ष) रा. इनामगाव ता. शिरूर जि. पुणे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या जेष्ठ व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघे जण हे रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आपले काम उरकून रस्त्याने पायी घरी चालले होते. यावेळी रस्त्याने आलेल्या भरधाव वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना येथील खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर या घटनेतील दुसऱ्या व्यक्तीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झालेला नव्हता.