समर्थ भारत वृत्तसेवा
आळेफाटा, ता. २९: नगर-कल्याण महामार्गावर आळेगावच्या नजीक लवणवाडी येथे मालवाहतूक वाहनाने दोन दुचाकींसह ८ शेतमजुरांना चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे. सुनंदाबाई रोहित मधे (वय. १८ वर्ष), गौरव रोहित मधे (वय. ६ वर्ष), रोहिणी रोहित मधे (वय. १८ महिने), नितीन शिवाजी मधे (वय. २२ वर्ष) सर्व राहणार पळशीवनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने उभे असलेले वाहने अंधारात दिसून न आल्याने दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहनावर आदळले. त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन जखमींना आळेफाटा खाजगी रुंगालयात दाखले केले. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीवरील १८ महिन्याची मुलगी बाजूच्या गटारात उडून पडली. याबाबत आळेफाटा पोलीस पुढील तपास करीत आहेत.