समर्थ भारत वृत्तसेवा:
कांद्याचे भाव कोसळत असल्याने विविध मागण्यांसाठी सोमवारी
महाविकास आघाडीतर्फे नांदगाव-येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यातील पाच माजी आमदारांनी या रास्ता रोको आंदोलनात
सहभाग घेतला. या आंदोलनामुळे नांदगाव-येवला मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प
होती.
सोमवारी कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध
मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट यासह सहकारी राजकीय पक्ष, संघटनांनी एकत्रित
येत नांदगावमध्ये रास्ता-रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्यातील अॅड.
अनिल आहेर, अॅड. जगन्नाथ धात्रक, पंकज भुजबळ, संजय पवार, राजाभाऊ देशमुख या पाच माजी आमदारांनी
केले. त्यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी गणेश धात्रक, संतोष बळीद, विजय पाटील, हरिश्वर सुर्वे, संतोष गुप्ता व
कार्यकत्यांनी आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलकांनी तब्बल दीड ते
दोन तास नांदगाव-येवला मार्ग रोखून धरला. या वेळी रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी
झाली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आहेत मागण्या:-
कांद्यास
प्रति क्विंटल एक हजार अनुदान मिळावा.
नार-पार
योजनेत नांदगावचा समावेश करण्यात यावा.
शेतकऱ्यांना
पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी.
नांदगाव रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्यांना थांबे मिळावे.