समर्थ भारत वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. २५ : कवठे येमाई (ता.शिरूर) येथील घोडनदी किनार गांजेवाडी शिवारामधे गायरान जमीनीत असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टी शिरूर पोलिस स्टेशन अंकित टाकळी हाजी औट पोस्टच्या पोलिसांनी कारवाई करत हि भट्टी उध्वस्त केली आहे.
मानवी आरोग्यास हानीकारक गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता बॅरलमध्ये कच्चे रसायन भिजत घालून त्याची दारू आणि त्याच ठिकाणी केमीकलयुक्त ताडी तयार करुन ग्राहकास विक्री करत असल्याने एका ईसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे १६ बॅरल मधील ३२०० लिटर कच्चे रसायन, प्लास्टिक चे कॅन, ग्लास तसेच ताडी असा मुद्देमाल जागेवरच पंचांसमक्ष नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस शिपाई दिपक पवार, विशाल पालवे यांच्या पथकाने केली.
शिरूरच्या बेट भागात अवैध धंद्यांना उधाण आले असून बहुतांशी घोडनदी, कुकडी नदी किनारी सुरू असलेल्या अशा सर्वच दारुभट्ट्यांवर कारवाई होणार का? याकडे बेट भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच कुकडी, घोड नदीच्या पलीकडील हाकेच्या अंतरावर असलेल्या अहमदनगर जिल्हयाच्या हद्दीतून शिरूरच्या बेट भागासह शहरात हातभट्टी दारुचा महापूर येत आहे. या हातभट्टी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.