समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, ता. २७: शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी
मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे
आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरू केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव ढमढेरे यांसह आदी ठिकाणी औद्योगिक वसाहतीत काही युवकांकडून ठेक्यासाठी कंपन्यांना त्रास देणे, खंडणी मागणे यांसारख्या घटना घडत असल्याने निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत आवाहनाचे फलक लावत त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक टाकलेले असून कंपन्यांना वेगवेगळ्या ठेक्यासाठी कोणी धमकावत असल्यास, त्रास देत असल्यास, विविध संघटना जबरदस्ती करत असल्यास, कोणी दहशत करत असल्यास, खंडणी मागत असल्यास, अडवणूक करत असल्यास तसेच माथाडी कामगार कामावर न ठेवता पैशाची मागणी करत असल्यास तसेच कोणीही आर्थिक पिळवणूक करत असल्यास पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी अन्यथा आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावे असे आवाहन केल्याबाबतचे फलक लावलेले असल्याने पोलीस स्टेशन हद्दीतील कंपन्यांना मोठा आधार मिळाला असून औद्योगिक वसाहतीमध्ये दादागिरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.